Saturday, June 02, 2007

एकाकी चाफा..!

- प्राजु.


काय म्हणता माझे नाव
चाफा म्हणूनी वदती सर्व
जात कुळी मध्ये मी एकला
पांढरा चाफा म्हणती मजला

रूप माझे असे की सुंदर
शुभ्र तनू अन नाभी शेंदूर
तारूण्याची लेऊन झालर
एकटेच जग़णे कसला हा वर

जीवन माझे सरता सरता
बहरून येतील वसंत-वर्षा
नवी विरूधा जन्म घेईल
उजळून निघतील दाही दिशा

साथसंगत सोडली त्यांनी
पानगळ आली म्हणोनी
खरट्यावरचे फूल होऊनी
काय पावलो जन्मा येऊनी

वाटते मग असेच करावे
जीवन आपुले सार्थ करावे
उतरूनी अलगद फांदीवरूनी
शिवचरणी त्या अर्पित व्हावे...

इतकी सुंदर का दिसते ती?

इतकी सुंदर का दिसते ती?
मनात माझ्या का ठसते ती?...

विचारता मी, टाळे उत्तर--
आणि खळाळुन का हसते ती?...

मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?...

मिटता डोळे समोर दिसते
आणि उघडता का नसते ती?...

भेटत नाही कधी तिला मी
तरी खुशाली का पुसते ती?...

कसे वागणे 'अजब' तिचे हे?
'नसताना'ही का असते ती?...

या बायडीस माझ्या (विडंबन)

- सुभाष डिके (कुल)


खादाड एका घरची , वारस शोभे त्यांची
पेहराव बारा इंची, या बायडीस माझ्या ॥१॥
खाटेवरी पडावे, 'बाई'स ओरडावे,
अन वेड नित्य खावे, या बायडीस माझ्या ॥२॥
खानावळीत जाई, चाखून सर्व पाही,
पैशाची पर्वा नाही, या बायडीस माझ्या ॥३॥
खर्चाने आली गरिबी, हे रत्न माझ्या नशिबी,
गांजून गेले धोबी, या बायडीस माझ्या ॥४॥
पोटात आणि ओठात, आजार नाही शरीरात,
सगळेच घास पचतात, या बायडीस माझ्या ॥५॥
खचले पलंग सोफे, खुर्ची दमून झोपे,
पाहता शिंपी कापे, या बायडीस माझ्या ॥६॥
खाण्याचे असू दे काम, मज वाटतसे प्रेम,
जपणार साती जन्म, या बायडीस माझ्या ॥७॥

कशी असावी माझी प्रिया...

-मर्द मराठा

ओठावर किंचित हसू, अन गालावरती खळी...
शोभतसे ती चंद्रकोर, रुंद तिच्या भाळी...
मूखकमळ ते उमलूनी यावे सोनेरी सकाळी
लखलखावी तेजोमय कांती रम्य सांजवेळी

वेणीतुनी निसटून यावी, हलकेच एक बट,
नजरेच्या त्या किरणांनी, खुलावा मनाचा पाट
"किस्मत ने साथ दिया तो" .. होईल माझीही भेट
आम्ही दोघे राजा-राणी, रम्य नदीचा काठ

ते नवयौवन ते सुखलोचन, सदैव करतो तिचेच चिंतन
निशाचरापरी रात्र काढतो, आठवणीने व्याकुळ होऊन
रोज पाहतो स्वप्न सुखाचे, प्रचंड आशा उरी बाळगून
सांग सखे तू प्रसन्न होशील का ह्या आहुतीतून ?

तरुणांच्या ओठातील ओळी , लेखणितुनि अवतरल्या...
तयामधला मी ही एक, म्हणुनी मला ह्या आठवल्या..
स्वप्नामधल्या ललना, ज्या तुजला आवडल्या..
नियतीचाही खेळ निराळा, त्या केव्हाच्या खपल्या...

मी वाटसरु...

- मर्द मराठा

अवघड माझी जीवन गाथा, खडतर माझा मार्ग...
असे दु:खाचे डोंगर, सहन किती मी करू
आयुष्याच्या वाटेवरला मी एक वाट्सरू

सुखाच्या शोधार्थ निघालो, मात्रुभूमिसिही मुकलो,
प्रियजनांच्या आठवणिने, मी ही थोडा व्याकुळ झालो

व्याकुळता ही आता कशी मी आवरु
आयुष्याच्या वाटेवरला मी एक वाट्सरू

काळाचा हा खेळ निराळा, नियातिनेही डाव उधळला
कोलमडलेल्या मनास माझ्या कसे मी सावरू
आयुष्याच्या वाटेवरला मी एक वाटसरु

मराठ्याची जात माझी, शिवप्रभू ला स्मरू
कळाची ही कुरघोडी काळावर उलतवू

पुन्हा एकदा श्री गणेशा, पुन्हा लढाई सुरु
आता पिछे हटने नाही "जिन्कू किंवा मरु"

आयुष्याच्या वाटेवरला मी एक वाटसरू

मध्यरात्री दाटले घन

मध्यरात्री दाटले घन, नीज झाली वैरिणी
काय करु, सांगा कुणी
मध्यरात्री दाटले घन, नीज झाली वैरिणी

सर्व दारी दीप जळती जीव माझ्या अंगणी
पवन वाटे सूळ, मारी टोमणे ही ओढणी
सांगु कोणा मी मनोगत? नीज झाली वैरिणी
काय करु, सांगा कुणी
मध्यरात्री दाटले घन नीज झाली वैरिणी

तू जिथे जिथे विहरशील

-नरेंद्र गोळे

तू जिथे जिथे विहरशील, माझी छाया साथ देईल || धृ ||

कधी माझी सय येऊन, जे ढळतील तुझे अश्रू |
तिथे येऊन रोखतील त्या, पुढे होऊन माझे अश्रू |
तू दिशेने ज्याही जाशील, माझी छाया साथ देईल || १ ||

तू उदास होशी कधी जर, तर उदास मीही होईन |
मी दिसो तुला, दिसो ना, तरी जवळी तुझ्याच राहीन |
तू कुठेही जात असशील, माझी छाया साथ देईल || २ ||

मैत्री

-सागरसमुद्र

मैत्री म्हणजे काय असते ?
मैत्री म्हणजे काय असते ?
वाळवंटा एवढ्या दुःखात मायेचे एक झाड असते
खवळलेल्या समुद्रात पैलतिरी नेणारी नाव असते
अस्वस्थ मनास दिलसा देणारी एक शक्ती असते

मन आवर मन आवर..

-सतीश

मन आवर मन आवर
माझ्या शब्दांच्या जाळ्यात अडकू नकोस
अशी माझ्या मोहात पडू नकोस
हे प्रेम नाही तर काय आहे
भावनांना उचंबळून देऊ नकोस
मन आवर मन आवर

न सुचलेली कविता

-राहुल

खूप प्रयत्न करून पाहिला,
पण कविता काही सुचली नाही.
तत्वांची असो वा सत्वांची,
शब्दांची सीमा अजूनही रूचली नाही.

न पाहिलेला मित्र

-राहुल

कधीकधी उगीचच कुणाचीतरी कमरता जाणवते.
त्या नसलेल्या, न भेटलेल्या किंवा कदाचित भेटून दूर गेलेल्या
माझ्या मित्रासाठी या चार ओळी..

असा कोण हा मित्र माझा,
ज्याची हुरहुर लागलीय क्षणोक्षण
न पाहिलेला स्वप्नसखा
त्याचा विरह भोगतोय मनोमन.

चिंब भिजलेली रात्र

-राहुल

चिंब भिजलेली एक रात्र
अजुनही निजली नाही
तुझ्या आठवणींची एक सर
अजूनही सरली नाही

किती वारे आले अन् गेले कितीतरी
तुझ्या श्वासाने दरवळलेली एक झुळुक
अजूनही विरली नाही

शिंपडू देत मनसोक्त आज मला
माझीच आसवे
तुझ्या विरहाची अग्नी
अजूनही शमली नाही

श्रावणमास

-बालकवी

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणांत येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे !

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! ती उघडे
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळेपिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा;
सर्व नभावर होय रेखिले सुंदरेतेचे रूप महा.

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरे सावरिती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारेही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे.
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे

सुवर्णचम्पक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला;
पारिजातही बघता भामारोष मनीचा मावळला!

सुंदर परडी घेउनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले-पत्री खुडती,

देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत,
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत!

मी भाग्यवंत...

-Rahul Bhalerao
कधी कधी दुसऱ्याचे बोलसुद्धा स्वतःचेच वाटतात... अशीच एक मनाला भिडलेली..
forward होऊन आलेली.. एक कविता..

मी भाग्यवंत...

संध्यादेखील करतो मी, दारूसुद्धा पितो मी,
पुरणपोळी चापतो मी, तंगडीदेखील तोडतो मी

हिंदी सिनेमे पाहतो मी, विंग्रजीसुद्धा झाडतो मी,
'दादांना' मात्र तोड नाही, एवढेच फक्त मानतो मी

शिव्यादेखील देतो मी, कवितादेखील करतो मी,
कधी कुणालाही हरवतो मी, कधी जिंकता जिंकता हरतो मी

आध्यात्मावर बोलतो मी, फ्लर्टिंगसुद्धा करतो मी,
'मी मी' करतो मी, कधी 'selfless' देखील होतो मी

प्रेम करत नाही कुणी, म्हणून 'डिप्रेस' देखील होतो मी,
स्वतःलाच समजावतो मग, "नाही रे, त्यांच्याच नशिबात नाही मी!"

कधी देवाशी बोलतो मी, कधी मौनाला धरतो मी
जिवलग एखादा चुकलाच तर, लेक्चरसुद्धा झाडतो मी

सगळ्या जगाचे प्रश्न सोडवायला, असतो नेहमीच उत्सुक मी
स्वतःचे प्रश्न सोयीने मात्र, अनुत्तरीतच ठेवतो मी

"आपलं आयुष्य वेगळं, आपली दुखः वेगळी.."
नेहमी स्वतःच्याच कक्षेत फिरतो मी...
सभोवती मात्र जेव्हा असहाय्य दीन पाहतो मी,
खरंच, स्वतःला खूप भाग्यवंत समजतो मी.

प्रकाशधारा

-राहुल
चला वर्षवू प्रकाशधारा, तिमिरांच्या जगती।
चला फैलवू स्नेहसुगंधा, दुरितांच्या जगती।।

याच दलदलीतुनी उगवतील
पंकज ज्ञानाचे
याच गलबलीतुनी झेपवतिल
पक्षी स्वातंत्र्याचे

समतल, उज्वल, उदात्त धेय्य तव
पर्वतही झुकती ।।१।।
चला वर्षवू...

कोटि-कोटि कर किरणांसम तव
अवगत प्रज्ञाने
उजळुनी टाकी सुवर्णापरी
उजाड उद्याने

आकांक्षेने आज उद्याची
इतिहासे घडती ।।२।।
चला वर्षवू...

आज जागवू धम्मसविता
विश्वबंधुतेने
आज जोडुया मने मनांशी
मातीच्या धाग्याने

अवखळ वाटा मार्ग सोडिती
मानवा पुढती ।।३।।
चला वर्षवू...

सागरी-सांज

-राहुल
साद देती सखे गं या सागरी लहरी
येशील सांजवेळी या सागरी किनारी ।।धृ।।

येती किती तरी गं या सागरा उभारे
केस कुरवाळताना उठती किती शहारे
बोल छपवू नको गं ओठांच्या तिजोरी ।।
......येशील सांजवेळी

क्षितिजावरी अभाळ धरेवरी झुकले
प्रेम या सागराचे किनारी धडकले
भेटीस साक्ष देईल चांदणे रुपेरी ।।
......येशील सांजवेळी

रेंगाळला इथे गं हा रेशमी समीर
जात्या क्षणासवे होतोय जीव अधीर
आहे तुझ्याचसाठी हा श्वासही अखेरी ।।
......येशील सांजवेळी

तांबे-सोन्याची नांद

- ग्रेस

निळसर डोंगर घळीघळीतुन धूर धुक्याचा निघत असे
खेड्यामध्ये गांव पुरातन तसा वसविला मला दिसे

खडकसांधणी परी नदीचे वळण पुलातुन निघे पुढे
पारदर्शनी पाण्याखालून माशांचाही जीव रडे

हातामध्ये रिक्त कमंडलु, तहान गळ्यावर घे जोगी
गावापासुन दूर अरण्ये वणवा वणव्याच्या जागी

अग्नीशी संगनमत सोडूनिया वाराही ईकडेच फिरे
पंथ सोडुनी जशी प्रणाली एकट कवितेतून झरे

मनगट उसवी लख्ख तांबडे कडे चमकते की जळते
जळते तांबे कनकदिप्तीवर खरेच का सोने होते?

वाळुवरुनी पाय उचलिता गुडघे कोपर झांझरती
मेंदुमधुनी शिळा अहिल्या झर्रकन ये चरणावरती

इथे मेघ झरण्याच्या पुर्वी वाकुन बघतो रे खाली
पात्र नदीचे किती भयंकर किती तळाची रे खोली?

उडे कावळा चिमण्यांनीही भुर्रकन अंगण सावरले
खेड्यामधले गावामधले लोक भाबडे बावरले

या पाणवठ्यावर

- रॉय किणीकर

या पाणवठ्यावर आले किती घट गेले
किती डुबडुबले अन बुडले वाहुनि गेले
किती पडले तसेच काठावरती
किती येतील अजुनि नाही त्यांना गणती

हा असा राहु दे असाच खाली पदर
हा असा राहु दे असाच ओला अधर
ओठात असु दे ओठ असे जुळलेले
डोळ्यात असु दे स्वप्न निळे भरलेले

संपेल कधी ही शोधायाची हाव
फोडिले दगड दशलक्ष दिसेना देव
पसरतो शेवटी हात तुझ्या दारात
अश्रुत भिजावी विझताना ही ज्योत

ही वाट वेगळी तुझी नसे रे त्यांची
ही दुनिया आहे केवळ हसणाऱ्यांची
दाखवू नको रे डोळे ते भिजलेले
जा तुडवित काटे, रक्ताने जरी भरलेले

काळोख खुळा अन खुळीच काळी राणी
संकोच मावला मिठीत सुटली वेणी
अंजिरी चिरी विस्कटे सुटे निरगाठ
ओठात चुंबने भरली काठोकाठ

गुदमरली काजळकाठावरची धुंदी
कळवळली हिरवी तळटाचेवरची मेंदी
पाळणा झुले मांडीवर मिटले ओठ
पदरातुनी फिरली एक तान्हुली मूठ

ओठात अडकले चुंबन रुसले गाल
कोयरीत हिरवा चुडा विरघळे लाल
घालता उखाणा फणा रुपेरी खोल
अंकुरले अमृत ढळता नाभी कमळ

असाच

- ना. घ. देशपांडे

वेगळीच जात तुझी;
वेगळाच ताल
तूं अफाट वाट तुझी
एकटाच चाल.

एकटाच चालत जा
दूर दूर दूर
गात गात तूंच तुझा
एकटाच सूर

एकटाच चालत जा
उंच आणि खोल;
बोल आणि ऍक पुन्हा
तूं तुझा बोल.

तूं असाच झिंगत जा
विस्मरून पीळ
तूं असाच फुंकीत जा
अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा
भास तूं तुझेच्;
शांततेत ऍकत जा
श्वास तूं तुझेच.

खोल या दरीत अशा
गर्द साऊलीत
हो निमग्न तूंच तुझ्या
मंद चाहुलीत.

तुझे नाम मुखी

- केशवसुत

केशवसुतांनी त्यांच्या अखेरच्या काळात केलेली ही शेवटची कविता (अभंग)

तुझे नाम मुखी ध्यान तुझे डोळा
व्रुत्ती या चंचळा स्थिरावल्या॥

चिंता भय दुःखे अवघी दूर झाली
अनाथांचा वाली जवळी केला॥

भिकार या जगी इच्छित न मिळे काही
म्हणुनी तुझे पायी भिक्शां-देहि॥

केशवसुत म्हणे देवा दीन-नाथा
तुझे पायी माथा वाहियेला॥

स्फूर्ती

- केशवसुत

काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
प्राशन करिता रंग जगाचे कणोकणी ते बदलू द्या !

अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपि पर्वा कसली मग याची !
जिव्हेची बंधने तर ढिली करा तीव्र या पेयाने,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगाने !
होउनिया मग दंग मनी,
व्हावे ते आणा ध्यानी,
गा मग सुचतिल ती गाणी,
परिसुनी त्यांचे शब्द, रुढीचे द्यास झणी ते खवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उकळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हाला !
औचित्याच्या फोल विवेका, जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरी जाऊ
उडुरत्ने ती गरीब धरेला तेथुन फेकुनिया देऊ !
अडवतील जर देव, तरी
झगडू त्यांच्याशी निकरी
हार न खाऊ रतीभरी !
देवदानवा नरे निर्मीले हे मत लोकां कवळू द्या !
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

पद्यपंक्तीची तरफ आमुच्या की विधीने दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसे !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे.
उडवुनि देऊनि जुलुमाचे या करु पहा तुकडे तुकडे !
महादेव ! हरहर ! समराचा गर्जत तो वाऱ्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कर्णी ..निजती ते ठारची मरती !
उठा उठा बांधा कमरा
मारा किंवा लढत मरा
सत्वाचा उदयोस्तु करा !
छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तीमित जगाला ढवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

कोलंबसाचे गर्वगीत - कुसुमाग्रज

- कुसुमाग्रज

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

दूर

दूर

दूर तेथे...दूर तेव्हा सांज झाली
दूर तेथे आपलीही लाज गेली
एक तूं अन एकला मी एक झालों
एक होतांना घनाच्या आड गेलों
झाकला लाजून तूं गे गाल डावा
त्या घनाच्या आड होता चंद्र तेव्हा...

-आरती प्रभू

मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे

तू गेलीस तेव्हा 'थांब' म्हणालो नाही
'का जाशी' ते ही 'सांग' म्हणालो नाही.
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
'हे अंतर आहे लांब' म्हणालो नाही ...

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का ही नजरच ओली होती
निपटून काढता डोळ्यांमधले पाणी'
जा! फिटले सारे पांग!'- म्हणालो नाही

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे!
असहाय लागला आतून वणवा सारा
पण वणव्याला त्या आग म्हणालो नाही...

बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग- म्हणालो नाही...

हे श्रेय न माझे तुझेच देणे आहे!
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग- म्हणालो नाही...

मुली

मुली

'मुलीची जात'
हे शब्द उच्चारवत नाही मला!
मुली कशाही वागल्या
तरीही...
मुली मुलीच असतात!
किती तन्मयतेनं
त्या सजवित राहतात घर!
त्यांच्या नुसत्या असण्याने
बोलू लागतात भिंती
नि डोलू लागते छप्पर...
मुली भरुन टाकतात अंगण
नि वळचणीतले रांजण
मनातल्या स्वप्नांनी-रंगांनी
शाश्वत रंगांनाही रंग देण्याचे
कौशल्य असते त्यात.
हा सोस नसतो मुलींचा
तर ध्यास असतो नव्या उर्मींचा!

मुली असतात
उन्हाची कातरछाया
लहरती.. बहरती कापूर काया
त्या सुखाचा मंद प्रकाश
नि मायेचं झुलतं.. धुंद आकाश
त्या विश्वाचा कोवळा हात
जगाची अधाशी तहान
त्या असतात
काळाचे फडफडते
कोरे करकरीत पान...
म्हणून मुलींना
करु द्यावेत हट्ट
नि होऊ द्यावे स्वच्छंदी
हीच तर असते
त्यांच्या प्राक्तनात पेटलेल्या
निरांजनातील असोशीची नांदी.

- अशोक कोतवाल