Saturday, June 30, 2007

ओरखडा

हिरवी फान्दी
उमलत्या कळ्या
फान्दीवर उरलेला
एखादाच काटा..!

शब्दही असेच कधी
डवरतात...
...बहरतात
पडतात सडा होउन..किन्वा
नुसतेच सलतात!
तेव्हा...
कुठून तरी एक
हळवी दाद...
समजाव
मोहरण, बहरण
कुणीतरी टिपलय!

झेललाय कुणीतरी
...काळजावर सडा
निदान...
..एखादा ओरखडा!!!

तु

मी कधीच म्हटले नाही तुला,
तुही हो माझ्यासारखच..
माझ्यासाठी हळव.....
मी कधीही म्हणणारही नाही तूला
तुही हो त्रुषार्थ
माझ्यासारखा....
कारण हजारात एखादाच होउ शकतो
खरा चातक....!
नाही तर काही आगन्तुक पक्षीही
असतातच ना
प्रत्येक वसन्तात येणारे....
नी शिशीरात सोडुन विखुरणारे
आकाशभर........!!!

श्रद्धा.....

काल रात्री गंमत झाली, Breaking News परत आली.
तर्काच्या ऐवेजी अंधश्रद्धा नाचली, समुद्रावर ही.. गर्दी लोटली.

चमत्कार चमत्कार, पीर बाबाला नमस्कार,
बाबाची करणी, समुद्रात गोड पाणी.
सब रोगोंका एकही इलाज.....
लोक गाऊ लागली गाणी, पिऊन घाणेरड ते गटाराचे पाणी.
हीच आपली थोर संस्कृती, तरी थांबली आहे विकासाची गती.

आता विकास म्हणतात ते तरी काय?

कशा पाई करतात कष्ट? का बोलू मी स्पष्ट!!
मी स्पष्ट बोलून कुठच जग हलणार आहे,
दीड अब्जांच्या गोंगाटात लगेचच विरून जाणार आहे!
सर्व नाक डोळे मेंदू कान, झुकवितात केवळ अंधश्रद्धे साठी मान.
अशी श्रद्धा काय कामाची, जी घेऊन येई महामारी.
मला सगळे दिसते स्पष्ट, सर्व होणार आहे नक्किच नष्ट.

निसर्ग हा कृती अपेक्षितो, बलवान हा दुर्बलाला भक्षतो.
जगात बलवान किती, दुर्बल किती, मांडता येतील का आकडे?
सगळ्यात सोप्पे, व्हा मोकळे, घालून देवाला साकडे.

मुख्यमंत्री करतात महापूजा. घालून बारा अंगठ्या दहा बोटात.
चिंता नसते जनांची, तर नवीन वर्षात काय भरायला मिळेल पोटात.
या अंधश्रद्धेची वाटते मला लाज, अंगावर नसते चिंधी तरी चढवतात देवीवर साझ.

मुंबई-शांधाई, पुणे- बॉस्टन,
हे बोलणे केवळ मिठाईचे वेष्टण.
बिन्डोक जनतेला दाखवतात आतल्या मिठाईची लाच,
लावून IT Park ला भिंतभर काच.

त्या काचेपलिकडे दडली आहे वैचारिक कमकूवत,
असाध्य-साध्य कसे होईल, पाश्चात्य शैली अनुकरत!!
IT मधून आला पैसा, तळागाळात कसा पोचणार?
नवे मम्मी-डॅडी मुलांसोबत केवळ BIG Mac खाणार.

नव्या गाडीतून घरी जाता जाता, येई दत्त मंदिर आडवे,
गाडीतूनच "ओठ-कपाळ" करून गातात Indian cultural गोडवे.
लायकी तसे मिळते, अजूनही निम्मी जनता दोन घास कमीच गिळते.

उपाय काय?? वैतागून टेबलावर घट्ट मूठ आपटली,
बिचारी मुंगी त्याखाली सापडली.
मेल्या मुंगीने दिली कल्पना, चिरडून टाका त्यांना,
ज्यांना नाही फिकीर कोणाची, ना मनाची ना जनाची.
सुचून असली कल्पना, मी गालातल्या गालात हसलो,
काम सोडून या नव्या कुठल्या फंदात मी फसलो!!!!

समस्येचे कळले बहुतेक मला मूळ,
काळच ठरवेल, हे माझे ध्येय का माझे खूळ.
कामे करून घ्यायला, झिजवीन माझ्या बुटाची टाच,
तरी देणार नाही, एक दमडी देखिल मी कोणाला लाच!!!!!

---------------शिरीष माधव गानू

हरवलेला मी

स्वप्नील डोळ्यांची उघडझाप करत
जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी
कान माझे चक्क फितूरी करायचे
मात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी

अखंड उत्साही बडबड तुझी
कानावरुन जायची वाहून
पण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचा
न्यायचा माझं मी पण पळवून

'असा काय रे बघतोस हरवल्यासारखा........'
तू म्हणायचीस नेहेमी
'अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात
सारखा हरवतो माझा मी'.

'तुझं आपलं काहीतरीच......'
तू टिंगल करायचीस माझी
पण ते लाजरं खळीतलं हसू तुझं
खरं खरं बोलायचं माझ्याशी

सूर्याचं अस्ताला घाईघाईने जाणं
अन तुझं गडबडीनं उठणं
रेंगाळलेली किरणं गोळा करत
माझं उद्याची वाट पहाणं

'येते रे' म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर
ओढाळ पावलं अन ओली पापण्यांची झालर
पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू
अन अजूनही हरवलेला मी
अन अजूनही हरवलेला मी

तू हवा..... तू हवा!

स्वप्नातील गोड भास
सत्यातील आस तू
हवीस तू.... हवीस तू

मोहक तू लडीवाळ
मिश्कील आणि खट्याळ
बोल तुझे किती मधाळ
सत्य असून स्वप्न तू
हवीस तू...हवीस तू

गझल तूच नटलेली
सूरात चिंब भिजलेली
हृदयातील श्वासांची
सूरेल एक तान तू
हवीस तू... हवीस तू

स्पर्श तुझा लाजरा
श्वास तुझा मोगरा
पाहूनी तुझ्या अदा
कूस बदलती ऋतू
हवीस तू... हवीस तू

Friday, June 22, 2007

खाली डोकं वर पाय

जेव्हा तिला वा असतं, तुम्ही जवळ यावं
जवळ यावं याचा अर्थ, तुम्ही जवळ घ्यावं !
अशा क्षणी चष्मा पुसत, तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला,
व्यामिश्र अनुभूती, शब्दांनी तोलत बसला !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
जेव्हा ती लाजत म्हणते, "आज आपण पावसात जायचं"
याचा अर्थ चिंब भिजून, तिला घट्ट जवळ घ्यायचं,
भिजल्यामुळे खोकला होणार, हे तुम्ही आधीच ताडलंत,
भिजणं टाळून खिशातून, खोकल्याचं औषध काढलंत !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
तिला असतो गुंफायचा, याच क्षणी श्वासात श्वास,
अनंततेवर काळाच्या, तुमचा असतो दृढ विश्वास,
तुम्ही म्हणता थांब जरा,
आणि होता लांब जरा,
तुम्ही चिंतन करीत म्हणता, "दोन श्वासांमध्ये जे अंतर असतं,
काळाच्या पकडीत ते कधीसुद्धा मिळत नसतं !"
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !
भाषेच्या ज्ञानाने तर, तुम्ही महामंडित असता,
व्याकरणाचे बारकावे, त्याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता !
तर काय, तर काय?
खाली डोकं, वर पाय !

मन उधाण वाऱ्याचे

मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहूरत्या सांजेला कधी एकटेच झुरते..
सावरते बावरते घडते अडखळते का पडते,
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते...
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते..
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते.................
रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते,
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते..
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..
जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते..
भाबडे तरी भासांच्या मागून पळते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते..................

पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबात

पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबात
सगळं जग एकवटून येत..
मनातली रडगाणी वाहून नेत,
नविन सूरातील तराणे गातं..
प्रत्येक थेंबात तेच पाणी, पावसाची तिच जूनी गाणी
पण शब्दाविना आकाशाशी आनंदाची देणी घेणी..
मनामधलं मळभ जणू धाव घेउन आभाळ गाठत,
अन नभातील इंद्रधनु परत मनात बस्तान थाटतं..
डोळ्यामधल पाणी सुद्धा वाहण आता विसरुन जातं,
जलधारांच्या वेगाबरोबर दुःख जणु ओसरुन जातं..
मातीच्या या सुवासासारखं दुसरं काही असत नाही,
कुपी मधल्या अत्तराला मन आता फ़संत नाही..
पावसाचे ते पाणी घराच्या छतावर
हळुवार आपटत असते,
आपल्यातल्या बावरलेल्या बाळाला जणु,
आई प्रेमाने थोपटत असते..

तुझ्याचसाठी

तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी कुणीतरी झरत आहे
गच्च निळ्यां आभाळात एक नभ संरत आहे
मनाचा डोह होतो आठवणींनी चिंब
त्या मनाच्या डोहतही पुन्हा तुझेच प्रतीबिंब

डोळ्यांनी का होईना आता बोलुन् घे प्रिये
तुला शब्द सुचतील तेव्हा कुठे असेन कुणास् ठाऊक?
तुला सुर सापडेल असे काहीतरी आत्ताच कर
तुल शब्द सुचती ल तेव्हा असेन नसेन कुणास् ठाऊक?

तु आहेस म्हनुन माझ्या आयुष्याला आहे अर्थ,
तु नसशिल् तर् माझे जिवन आहे व्यर्थ .
मेघानवाचुन नभामध्ये पाणी कधी जमेल् काय् ?
तुला वजा केल्या नतर माझ्यासाठी जगात काही उरेल काय् ?

डोळ्यांमध्ये वादळ आणी ह्रुदयामध्ये घाव् आहे,
त्या घावाच्या पाठीमागे वेदनेचा एक् गाव आहे.
तिथली लाल गुलाबे पाहुन सर्व माणसे फसतात्,
प्रेमामध्ये ह्या पडुन सर्व भान् विसरतात्.

धूके दाटलेले उदास उदास

मंगेश पाडगांवकर

धूके दाटलेले उदास उदास
धूके दाटलेले उदास उदास
मला वेढीती हे तुझे सर्व भास ॥धृ.॥

उभी मूक झाडे, विरागी किनारा
झुरे अंतरी अन फिरे आर्त वारा
कुणी ही ना इथे दिसे आसपास ॥१॥

कुठे चालल्या या दिशाहीन वाटा
कुणा शोधिती या उदासीन लाटा
दिशांतून दाटे, तुझा एक ध्यास ॥२॥

क्षणी भास होतो, तुझे सूर येती
जीवा भारुनी हे असे दूर नेती
स्मृती सोबतीला असा हा प्रवास ॥३॥

प्रेमात पडतांना

प्रेमात पडतांना , तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं ,
तोंड दुखेपर्यंत बडबडतांना , हवं ते सांगायचं राहून गेलं .

ती हो म्हणेल की नाही म्हणेल की देईल ठेवून एक मुस्काटात,
हा अशुभ विचार करता -करता हवं ते घडायचं राहून गेलं .

नुसताच बघत बसे मी तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये
तिच्या डोळ्यात स्वतःला शोधतांना माझ्याविना तिचं अडायचं राहून गेलं .

तिच्या ओढणीचा , खांद्याचा स्पर्श हवा- हवासा वाटतसे नेहमी,
सांगीन तिला कधीतरी म्हणतांना हा विषय काढायचं राहून गेलं .

प्रत्येक भेटीनंतर ती जातांना घालमेल जीवाची असह्य होई ,

त्या दिवशीही ती निघाली अन..... तिला अडवायचं राहून गेलं .....

कशी ही प्रीत

त्याच्या प्रेमाच्या सादेला मी रुकार दिला आणि सगळं आयुष्यच बदललं......!
सगळी दुनिया अचानक रंगीबेरंगी झाली.

अवचित भेट कशी रे घडली
ध्यानी मनीही नसताना
नकळत प्रीत कशी ही फुलली
गाफिल मन हे असताना

क्षणात बदले सारी दुनिया
गुलाब पखरण चोहीकडे
फुले पिसारा मनमोराचा
नर्तन त्याचे तुझ्यापुढे

एकांती मग उगाच हसणे
तुला आठवून उगीच झुरणे
स्वप्नामधल्या सहवासाने
पुन्हा पुन्हा ते पुलकित होणे

समय गुलाबी पंख पसरुनी
असाच अलगद विहरावा
चिंब भिजावे प्रीतसरींनी
मनात दरवळ पसरावा

राहीले ओठांवरी.....

बोलायचे काहीच होते
बोलले काहीतरी
ओठातले हे शब्द माझे
राहीले ओठांवरी

स्वप्नातली मुर्त तीही
राहीली स्वप्नांतरी
ओठातले हे शब्द माझे
राहीले ओठांवरी

साहवेना ही व्यथा तू
भेट ना रे क्षणभरी
ओठातले हे शब्द माझे
राहीले ओठांवरी

ऐक ना अखेर ही रे
चालले मी दुसर्‍या तीरी
ओठातले हे शब्द माझे

श्रावणधारा

माझ्या ह्या कवितेचं विवेक काजरेकरांनी एका छानशा गाण्यात परिवर्तन केलंय.
माझ्या कवितेचं बनलेलं हे पहिलंच गाणं.

श्रावणधारा

रंगत येती तरंगत येती
जलदांमधूनी धावत येती

श्रावणधारा, जलदाधारा
धुंद वादळी, कापीत वारा
बहरत येती, मोहरत येती
सप्त सूर ते छेडीत येती

लाटा धाडून सागर मग तो
आसूसून ही वाट पाहतो
सरीता वाहे भान हरपूनी
सवे तयाच्या मीलन पाही

इंद्रधनूच्या कमानीतूनी
घेई चुंबन वेडी अवनी
भारुन जाई सारी धरती
पावसास त्या घेऊन कवनी

नि:शब्द आता सारा परिसर
मृद्गंधाचा ओला गहिवर
आठवणी त्या व्याकुळ नयनी
ठेवूनी जाई रंगीत गगनी

हृदय पाखरु

तू नसतोस ना माझ्याजवळ तेव्हा माझं चित्तच नसतं रे था-यावर!

हृदय पाखरु

रुंजी घालती तुझ्या सयी रे, माझ्या या हृदयी
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

तो जर असता आज इथे तर
तो जर नसता आज तिथे तर
जर तरच्या द्वंद्वात अडकले, खिन्न दिशा दाही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

मन लागेना कशात माझे
सूर तयाचा कानी वाजे
देहभान रे हरपून आता, वाट तुझी पाही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

धावत ये ना, मिठीत घे ना
तोडीत ये ना वृथा बंधना
माझी नव्हते कधीच मी रे, फ़क्त तुझी राही
कसे आवरु हृदय पाखरु, सांग मला काही

गूढ

खरंच........! गूढच म्हणायचं हे. हे पृथ्वीतलावरचं रहाटगाडगं कसं काय चालतं
हे एक मोठं कोडंच आहे. शास्त्रीय दृष्टीने प्रत्येक गोष्टीला कारणं असतील
सुद्धा. पण हे सगळं घडवणारा तो कोणी तरी आहे हे नक्की. प्रत्येक गोष्टीचं वळण
अगदी ठरलेलं...... आखून दिलेलं.

अजाण त्या कळीस तो
भमर कसा भेटतो
गूढ उकले ना परी
कितीही शोधिले जरी

जशी धरा आतूरते
गगनाच्या मीलना
जशी सरीता धावते
सागराच्या वळणा

कसे कुणी अनुसरीले
कुणी कुणा शिकवीले
प्रकृतीच्या आर्तक्याचे
चलन कुणी लाविले

काय शोधी तू मना
गुपीत का करी खुले
गूढ अंतरातले
कुणा कधी न सापडे

येशील कां?

सांग सख्या रे येशील का
स्वप्नात माझिया येशील का

वारा नांदी घेऊन आला
हसू गालावर खुलवून गेला
मिटूनी डोळे वाट पाहते, हरवूनी सकला येशील का

आसमंत तो धुंद जाहला
तुझ्याचसाठी व्याकुळ झाला
अलगद येऊनी, हळूच स्पर्शूनी, मोरपीस तू होशील का

रातराणीचा सुगंध आता
गात्रातून या वाहू लागला
मिठीत तुझिया विसरुनी सारे, बेहोश मला तू करशील का

या वेडीला काही ना कळे
तुझ्याविना ना काही उकले
एकदाच रे फ़क्त एकदा, माझा तू रे होशील का

परीसस्पर्श

तुझी आठवण येताच
खुलतं ओठावर हसू
मनातले भाव जणू
दाखवतात तसू तसू

लकाकतात रे ती
डोळ्यातली निरांजनं
अन पापण्या ही जपतात
ती प्रकाशाची स्पंदनं

उजळलेला मुखचंद्रमा
अधिकच होतो लाजरा
मनातले भाव बोलून
होतो कावराबावरा

जीवाची तगमग
वाढवते हुरहुर
तुझ्या आगमनाचे वेध
करतात मन आतूर

दिसताच तू रे मग
सुखावतात ही नेत्रं
परीसस्पर्शाने तुझ्या
उजळतात गात्रं

मी पण

माझे मी पण मी कधीच विसरले
सवे जेव्हा तुझ्या मी पहिल्यांदा बहरले

स्पर्शातून तुझ्या रे मोरपीस फुलले
मनातले तरंग सारे अधरांवर उमटले

सारं विश्व माझं व्यापून तू टाकलंस
मला मात्र पुरतं वेडं करुन सोडलंस

सूर्य, चंद्र, तारे, आकाश सारं काही तूच
हृदयातली छेडली जाणारी हर एक तार तूच

तुझ्यापासून सुरु आणि तुझ्यापर्यंतच सारं
वृथा आता माझ्यासाठी बाकी जग सारं

नव्हतास तू तेव्हा.......

मंतरलेली रात होती
तारकांची प्रणयी वरात होती

चंद्राची धुंद साथ होती
मौनाची नीरव साद होती

दिलात तुझी रे याद होती
सोबतीच्या तुझी आस होती

अनिवार अशी ती रात्र होती
फितूर सारी गात्रं होती

श्वासात आर्जवी ओढ होती
उरात हुरहुर गूढ होती

रात सरता सरत नव्हती
तुझ्याविना जणू व्याकुळ होती

नि:शब्द उसासे टाकीत होती
उष:काल ती मागत होती

वळवाचा पाऊस

अचानक आभाळ भरुन येतं
चोहोबाजूंनी कोसळू लागतं
तळाशी दडलेल्या आठवणी तरल होतात
कासावीस होऊन उचंबळून येतात

उधाणलेला समुद्र
बेछूट पिसाळलेला वारा
उठवतो मोहोळ आठवणींचे
पसरुन सैरावैरा

विचारांचं काहूर
घालतं मनात थैमान
कुरतडून टाकतं काळीज
होऊन दुष्ट सैतान

काहीतरी करायचं राहून गेलेलं
खूपसं उपभोगायचं विसरुन गेलेलं
हातातून वेळ निसटून गेलेली
अपुरेपणाची जाणीव देऊन गेलेली

आभाळ निरभ्र झाल्यावर
स्व्च्छ प्रकाशाची कवाडं उघडल्यावर
आरंभ होईल नव्या दिवसाचा
तृप्तीचं तेज ल्यालेल्या एका नव्या आयुष्याचा

तुझ्याविना

का रे इतकी बंधनं हवीत ह्या जगाची? कां मनाला हवं तसं जगता येऊ नये? नाही रे
जगता येत तुझ्याशिवाय!!

माझं अस्तित्व तुझ्याशिवाय
एक मोठं शून्य
जगातलं सारं काही व्यर्थ
तुझ्याशिवाय अन्य

जाणीव होताच ह्याची मला
कासावीस होतो जीव
तुझ्याविना माझ्या जगण्याची
मलाच येते कीव

कसली ती तगमग
कसली ती तडफ़ड
तुझ्याविना जगण्याची
कशासाठी ही धडपड

उधळून द्यावी सारी
बंधने वाटे आज
भिरकावून द्यावी ती
पांघरलेली लाज

धावत तुझ्याकडे येऊन
मनसोक्त रडून
सारं काही करावं मोकळं
कुशीत तुझ्या शिरुन.

प्रेमसमर

जयश्री

पाहू नकोस ना रे
मजसी असा गडे तू
मी विरघळून जाते
समजून घे जरा तू

आमंत्रणे तुझी ती
नजरेतूनीच येती
नि:शब्द आर्जवे ती
डोळेच व्यक्त करीती

करी पाठलाग माझा
मिश्कील भाव त्याचे
हळुवार सोडती ते
शर प्रेमबंधनाचे

लटका विरोध आता
किती वेळ भासवू मी
ओढाळ ह्या मनाला
किती वेळ थांबवू मी

तू जिंकलास जानू
हरले तुझी प्रिया मी
समरात ह्या मनाच्या
हरुनीही जिंकले मी

तुझे श्वास

श्वास तुझे ते मला दिलेले
संपत आले रे
कासावीस हा जीव होतसे
त्याविण माझा रे

श्वासांच्या त्या हिंदोळ्यांवर
झुलते मी ही तुझ्यासवे
स्पंदनात त्या अनुभवते मी
तुझ्या छबीचे रंग नवे

हळुवार त्या निश्वासांच्या
गोड गुलाबी स्पर्शाने
लाली चढते गो-या गाली
नकळत कशी ही लज्जेने

उमले ओठी हास्य चोरटे
आठवून त्या गुजगोष्टी
काटा फुलतो अंगावरती
तुझीच स्मरुनी गोड मिठी

रिती जाहले आहे पुरती
विना तुझ्या त्या श्वासांनी
दे ना आता श्वास नवे ते
घेऊनी मजसी तव कवनी

मुखवटे आणि चेहरे

किती मुखवटे, किती चेहरे
किती खोटे, किती खरे
प्रयत्न केला शोधायचा जर
भीषण सत्य येईल समोर
त्या सत्याला सामोरं कधी जाता येईल का?

रोज भेटणारे, बेगडी हसणारे
भेटल्यावर ओढून ताणून तारीफ़ करणारे
कसे ओळखायचे कोण आपले
कसे ओळखायचे मित्र यातले
मोजण्यासाठी काही परिमाण आहे का?

कुणाचा जीव तुटतो आपल्यासाठी
कोण हळहळतो आपल्या दु:खासाठी
खोटा कळवळा कोण दाखवतो
संकट येता कोण पाठ फ़िरवतो
कधी खरं खरं आपल्याला कळेल का?

कशाला हवेत हे जमाखर्च....
कशाला हवेत हे तर्ककुतर्क
समोर येईल त्याला म्हणावा आपला
बाकी सोडून द्यावा देवावर हवाला
असं काहीसं करता येईल का?

नाही देता आला पैसा जरी
द्यावा निर्भेळ आनंद परी
जीवन आपलं अमूल्य समजून
फुलवत जावं हास्य पसरुन
असं हसणारं फुल कधी बनता येईल का?

प्रेमाचे गणित!

तुझ्या माझ्या प्रेमातला संबंध,
एक कोम्प्लेक्स नंबरच आहे,
प्रेमाचा भाग रियल आहे,
पण लग्नाचा भाग जरा इमेजनरीच आहे,

एकमेकांशिवाय रहावतहि नाहि,
बाब अगदि बेरजेचि आहे,
आंतर्जातिय विवाहचा मुद्दा खटकतो,
त्याची वजाबाकि करणे मात्र गरजेचे आहे,

तुझं मझ्यावर अनं माझं तुझ्यावर,
प्रेम अगदि कसं रिलेशन मधे आहे,
आत्ता आपले ते एक्स्पोनेन्शिअल आहे,
पण लग्नानंतर म्हणे ते प्रपोर्शनल ग्राफ़च आहे,

३६ गुण जुळवणे ह्यांना बरे कळतं,
नाहि जुळले तर असं कोणचं आभाळ कोसळतं?
कधी ह्यांना कळणार, ३६ चं वैर जरी असलं,
तरी प्रेमात सगळे इक्वल इक्वल असतं,

खरच का लग्नाचे समीकरण एवढे अवघड आहे?
पण आपल्या प्रेमाचे गणित कुठे तेव्हा एवढे जड आहे?
तुलाहि कळाले अन ते मलाहि कळाले,
मग ह्या समाजाला कळायला काय गड्बड आहे?

म्हणुनच म्हणतो, तुझ्या माझ्या प्रेमातला संबंध,
एक कोम्प्लेक्स नंबरच आहे.

Monday, June 11, 2007

एक प्रवास

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा
इथे हळुच येवुन विसावलाय..एक प्रवास

या जगातील १० सत्य

या जगातील १० सत्य

1. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चात्ताप होतो अश्या
लोकांनी सरळ दुपारीच उठावे.

२. जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा
मारण्यासारखे आहे.

३. माणसाने नेहेमी स्पष्ट बोलावे म्हणजे ऐकणाऱ्यालाही स्पष्ट ऐकू जाते.

४. मूलभूत राजकीय पक्ष दोनच- सत्ताधारी, सत्ताकांक्षी

५. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने
बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.

६. मुलगा आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.

७. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.

८. देवा मला वाट पाहायची शक्ती दे... तीही आज आता ताबडतोब!

९. काही माणसे जिवंत असतात कारण खून करणे बेकायदा आहे म्हणून!

१०. काळ हा सर्वोत्तम शिक्षक आहे, पण तो आपल्या सगळ्या शिष्यांचा बळी

Friday, June 08, 2007

राहीलयं काय आता

लाख वाटल लपवाव जगापासुन या मनाला
तरीही आज तुझी कहाणी कळाली या जगाला
सगळ्यांनी वाचल दुःखं या प्रत्येक शब्दांतुन
काय लपवु राहीलयं काय आता लपवायला.

लाख मन सागंत होत कुठेतरी थाबांयला
वळण निघुन गेली नाही जमल वळायला
सारेच धावले एकदम सुखाच्या मागे
मी काय करु मला नाही जमल पळायला.

आज काय झाल तुला उगाच असं रडायला
कुठे चुकल्यासारखं नाही ना वाटत मनाला
अशी कीती सुखं तुझ्या पदरात पडली
जी कारणं होती तुझी तेव्हा मला सोडायला.

आजही कुठे जमतय मला तस जगायला
एक वणवा कमीच होती मला जळायला
कालच्या पुरातून कसाबसा वाचलो मी पण
डोळ्यातल्या पाण्यात नाही जमत पोहायला.

एक आठवण चाळून घे

नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.

जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे

आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे

नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.

मी तिच्यात नव्हतो

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती.

Wednesday, June 06, 2007

हरवलेला मी

स्वप्नील डोळ्यांची उघडझाप करत
जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी
कान माझे चक्क फितूरी करायचे
मात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी

अखंड उत्साही बडबड तुझी
कानावरुन जायची वाहून
पण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचा
न्यायचा माझं मी पण पळवून

'असा काय रे बघतोस हरवल्यासारखा........'
तू म्हणायचीस नेहेमी
'अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात
सारखा हरवतो माझा मी'.

'तुझं आपलं काहीतरीच......'
तू टिंगल करायचीस माझी
पण ते लाजरं खळीतलं हसू तुझं
खरं खरं बोलायचं माझ्याशी

सूर्याचं अस्ताला घाईघाईने जाणं
अन तुझं गडबडीनं उठणं
रेंगाळलेली किरणं गोळा करत
माझं उद्याची वाट पहाणं

'येते रे' म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर
ओढाळ पावलं अन ओली पापण्यांची झालर
पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू
अन अजूनही हरवलेला मी
अन अजूनही हरवलेला मी

तू हवा..... तू हवा!

स्वप्नातील गोड भास
सत्यातील आस तू
हवीस तू.... हवीस तू

मोहक तू लडीवाळ
मिश्कील आणि खट्याळ
बोल तुझे किती मधाळ
सत्य असून स्वप्न तू
हवीस तू...हवीस तू

गझल तूच नटलेली
सूरात चिंब भिजलेली
हृदयातील श्वासांची
सूरेल एक तान तू
हवीस तू... हवीस तू

स्पर्श तुझा लाजरा
श्वास तुझा मोगरा
पाहूनी तुझ्या अदा
कूस बदलती ऋतू
हवीस तू... हवीस तू

ही वाट दूर जाते

खूप दूरवर जाणारा रस्ता
कां वाटतो आपलासा
कायम वाट बघणारा
केविलवाणा बराचसा

सोबत त्याच्या एकदा मला
तुझ्या साथीनं जायचंय
खरंच कुठे जातो ते
शोधून काढायचंय

विरक्त साधूसारखा
असतो तो अलिप्त
साथ मात्र देतो तो
समजून सकला आप्त

येशील तू माझ्यासोबत...
जगाच्या अंतापर्यंत...
रस्ता फक्त निमित्त रे....
खरं तर साथ तुझी हवीये
जीवनाच्या अस्तापर्यंत.

तुझा हळवा पाऊस

आज आठवतो मला
चिंब सरीनं तयाच्या
आज भिजवतो मला

कधी बरसणं तुझं
रिमझिम अलवार
नखशिखान्त भिजते
त्यात मी रे हळुवार

कधी तुफानी कोसळ
गरजत बरसत
कधी झिम्माड झिम्माड
द्वाड प्रीत फुलवत

आता कधी रे येशील
मनी सारखा सवाल
घन दाटता नभात
पुकारते वेडी प्रीत

तुझ्याविना हा पाऊस
आसू आणतो डोळ्यात
धरा कोरडी कोरडी
परी डोळे वाहतात

तुझ्याविना हा पाऊस

तुझी इतकी सवय झालीये ना.........
की कुठलाही रंग तुझ्याविना अगदी बेरंग असतो.
त्यात पाऊस तर आपल्या दोघांचाही आवडता.
किती मनसोक्त आस्वाद घेतलाय ना आपण ह्या पावसाच्या स्वच्छंदीपणाचा....!
पण आज तू नाहीयेस........
आणि नेमका तो आलाय रे..........

सारे तुझ्यात आहे

आभास चांदण्याचा या लाजण्यात आहे
जे जे मला हवेसे सारे तुझ्यात आहे

तेजाळती कशा या बंदिस्त दोन ज्योती
ही आगळी दिलेरी तव काजळात आहे

ह्या सावळ्य़ा मुशीचे सौंदर्य जीवघेणे
जादू परी तुझी या साधेपणात आहे

स्वीकारुनी गुलामी बेचैन रात आहे
चंद्रात आज माझ्या ही खास बात आहे

संकेत हे गुलाबी, आवेग हा शराबी
केसात माळलेल्या या मोगर्‍यात आहे

ही आग मारव्याची ह्या गारव्यात आहे
गाफ़ील यौवनाची संपूर्ण मात आहे

हुंदका साधा तुझा

हुंदका साधा तुझा सांगून गेला
झाकलेली वेदना बोलून गेला

पाहुनी तव लोचनी आभाळ काळे
अंतरी पाऊस हा बरसून गेला

सावरु मी हा कसा संसार माझा
मांडलेला डाव तो उधळून गेला

प्रीत माझ्या अंगणी बहरेल कैसी
कोवळे अंकूर तो जाळून गेला

ओळखीचे हास्य तो विसरुन गेला
राहता तो ही दुवा निखळून गेला

वावडे होते जरी तुज मैफ़लीचे
सूर का मग आगळे छेडून गेला

मी अशी दुबळी पुन्हा त्याच्यासमोरी
चेहरा संपूर्ण तो वाचून गेला

वाट माझी ही अशी अंधारलेली
आठवांनी का अशी उजळून गेला

Tuesday, June 05, 2007

ती जेव्हा दिसते तेव्हा.....

ती जेव्हा दिसते तेव्हा ....मी रॉकेलच्या रांगेत असतो
अणि बिन बाह्यांचा मळका बनियान नेमका माझ्या अंगात असतो
कर्वे रोडचा पौड फ़ाटा तेव्हा माझ्या भांगात असतो
पण तरीही तोरा 'शाहरुख'चा माझ्या ढंगात असतो......

ती जेव्हा दिसते तेव्हा हातात माझ्या दळण असते,
मागे तीची आई आणि पुढे धोक्याचे वळण असते
वळणावरचे धोके टाळुन मी हळुच तीला हात करतो
आणि गीरणी मधला गद्दार बुटस ह्या सीझरचा घात करतो
मी पीठासकट आडवा होतो, माझा चेहरा रडवा होतो
माझा रडका चेहरा लपलेला पीठाच्या रंगात असतो
पण तरीही तोरा 'शाहरुख'चा माझ्या ढंगात असतो......

सध्या ती दिसते तेव्हा तिच्या बरोबर 'तो' असतो
आणि सध्या आमचा पिक्चर 'पति पत्नी और वो' असतो
मी आता 'मज़नू ' बनतो, ती वधु आणि तो वर असतो
ती त्याला 'बाझीगर' म्हणते आणि माझा मात्र 'डर' असतो

पण लव्हस्टोरी म्हटली की त्यात व्हिलन येणारच
उशीर होतो खरा पण तुमचे मिलन होनारच
मी मात्र दिवस - रात्र तिच्याच आठवणिंत जगत असतो
तीचा नवरा, तीची मुले, तीचा संसार बघत असतो

माझे हे स्वप्न एकुन ती मला खुप हसते
पण हसणाऱ्या डोळ्यांत तीच्या अश्रुंची एक लकेर असते

थरथरत्या ओठात तीचे शब्द तिथेच थांबतात
ओघळणारे अश्रु मग मुक्यानेच सांगतात,

"बागेत असो वा चिखलात शेवटी ग़ुलाब फ़ुलांचा राजा आहे
आणि रॉकेल असो वा दळण तु फ़क्त माझा आहेस."

Saturday, June 02, 2007

एकाकी चाफा..!

- प्राजु.


काय म्हणता माझे नाव
चाफा म्हणूनी वदती सर्व
जात कुळी मध्ये मी एकला
पांढरा चाफा म्हणती मजला

रूप माझे असे की सुंदर
शुभ्र तनू अन नाभी शेंदूर
तारूण्याची लेऊन झालर
एकटेच जग़णे कसला हा वर

जीवन माझे सरता सरता
बहरून येतील वसंत-वर्षा
नवी विरूधा जन्म घेईल
उजळून निघतील दाही दिशा

साथसंगत सोडली त्यांनी
पानगळ आली म्हणोनी
खरट्यावरचे फूल होऊनी
काय पावलो जन्मा येऊनी

वाटते मग असेच करावे
जीवन आपुले सार्थ करावे
उतरूनी अलगद फांदीवरूनी
शिवचरणी त्या अर्पित व्हावे...

इतकी सुंदर का दिसते ती?

इतकी सुंदर का दिसते ती?
मनात माझ्या का ठसते ती?...

विचारता मी, टाळे उत्तर--
आणि खळाळुन का हसते ती?...

मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?...

मिटता डोळे समोर दिसते
आणि उघडता का नसते ती?...

भेटत नाही कधी तिला मी
तरी खुशाली का पुसते ती?...

कसे वागणे 'अजब' तिचे हे?
'नसताना'ही का असते ती?...

या बायडीस माझ्या (विडंबन)

- सुभाष डिके (कुल)


खादाड एका घरची , वारस शोभे त्यांची
पेहराव बारा इंची, या बायडीस माझ्या ॥१॥
खाटेवरी पडावे, 'बाई'स ओरडावे,
अन वेड नित्य खावे, या बायडीस माझ्या ॥२॥
खानावळीत जाई, चाखून सर्व पाही,
पैशाची पर्वा नाही, या बायडीस माझ्या ॥३॥
खर्चाने आली गरिबी, हे रत्न माझ्या नशिबी,
गांजून गेले धोबी, या बायडीस माझ्या ॥४॥
पोटात आणि ओठात, आजार नाही शरीरात,
सगळेच घास पचतात, या बायडीस माझ्या ॥५॥
खचले पलंग सोफे, खुर्ची दमून झोपे,
पाहता शिंपी कापे, या बायडीस माझ्या ॥६॥
खाण्याचे असू दे काम, मज वाटतसे प्रेम,
जपणार साती जन्म, या बायडीस माझ्या ॥७॥

कशी असावी माझी प्रिया...

-मर्द मराठा

ओठावर किंचित हसू, अन गालावरती खळी...
शोभतसे ती चंद्रकोर, रुंद तिच्या भाळी...
मूखकमळ ते उमलूनी यावे सोनेरी सकाळी
लखलखावी तेजोमय कांती रम्य सांजवेळी

वेणीतुनी निसटून यावी, हलकेच एक बट,
नजरेच्या त्या किरणांनी, खुलावा मनाचा पाट
"किस्मत ने साथ दिया तो" .. होईल माझीही भेट
आम्ही दोघे राजा-राणी, रम्य नदीचा काठ

ते नवयौवन ते सुखलोचन, सदैव करतो तिचेच चिंतन
निशाचरापरी रात्र काढतो, आठवणीने व्याकुळ होऊन
रोज पाहतो स्वप्न सुखाचे, प्रचंड आशा उरी बाळगून
सांग सखे तू प्रसन्न होशील का ह्या आहुतीतून ?

तरुणांच्या ओठातील ओळी , लेखणितुनि अवतरल्या...
तयामधला मी ही एक, म्हणुनी मला ह्या आठवल्या..
स्वप्नामधल्या ललना, ज्या तुजला आवडल्या..
नियतीचाही खेळ निराळा, त्या केव्हाच्या खपल्या...

मी वाटसरु...

- मर्द मराठा

अवघड माझी जीवन गाथा, खडतर माझा मार्ग...
असे दु:खाचे डोंगर, सहन किती मी करू
आयुष्याच्या वाटेवरला मी एक वाट्सरू

सुखाच्या शोधार्थ निघालो, मात्रुभूमिसिही मुकलो,
प्रियजनांच्या आठवणिने, मी ही थोडा व्याकुळ झालो

व्याकुळता ही आता कशी मी आवरु
आयुष्याच्या वाटेवरला मी एक वाट्सरू

काळाचा हा खेळ निराळा, नियातिनेही डाव उधळला
कोलमडलेल्या मनास माझ्या कसे मी सावरू
आयुष्याच्या वाटेवरला मी एक वाटसरु

मराठ्याची जात माझी, शिवप्रभू ला स्मरू
कळाची ही कुरघोडी काळावर उलतवू

पुन्हा एकदा श्री गणेशा, पुन्हा लढाई सुरु
आता पिछे हटने नाही "जिन्कू किंवा मरु"

आयुष्याच्या वाटेवरला मी एक वाटसरू

मध्यरात्री दाटले घन

मध्यरात्री दाटले घन, नीज झाली वैरिणी
काय करु, सांगा कुणी
मध्यरात्री दाटले घन, नीज झाली वैरिणी

सर्व दारी दीप जळती जीव माझ्या अंगणी
पवन वाटे सूळ, मारी टोमणे ही ओढणी
सांगु कोणा मी मनोगत? नीज झाली वैरिणी
काय करु, सांगा कुणी
मध्यरात्री दाटले घन नीज झाली वैरिणी

तू जिथे जिथे विहरशील

-नरेंद्र गोळे

तू जिथे जिथे विहरशील, माझी छाया साथ देईल || धृ ||

कधी माझी सय येऊन, जे ढळतील तुझे अश्रू |
तिथे येऊन रोखतील त्या, पुढे होऊन माझे अश्रू |
तू दिशेने ज्याही जाशील, माझी छाया साथ देईल || १ ||

तू उदास होशी कधी जर, तर उदास मीही होईन |
मी दिसो तुला, दिसो ना, तरी जवळी तुझ्याच राहीन |
तू कुठेही जात असशील, माझी छाया साथ देईल || २ ||

मैत्री

-सागरसमुद्र

मैत्री म्हणजे काय असते ?
मैत्री म्हणजे काय असते ?
वाळवंटा एवढ्या दुःखात मायेचे एक झाड असते
खवळलेल्या समुद्रात पैलतिरी नेणारी नाव असते
अस्वस्थ मनास दिलसा देणारी एक शक्ती असते

मन आवर मन आवर..

-सतीश

मन आवर मन आवर
माझ्या शब्दांच्या जाळ्यात अडकू नकोस
अशी माझ्या मोहात पडू नकोस
हे प्रेम नाही तर काय आहे
भावनांना उचंबळून देऊ नकोस
मन आवर मन आवर

न सुचलेली कविता

-राहुल

खूप प्रयत्न करून पाहिला,
पण कविता काही सुचली नाही.
तत्वांची असो वा सत्वांची,
शब्दांची सीमा अजूनही रूचली नाही.

न पाहिलेला मित्र

-राहुल

कधीकधी उगीचच कुणाचीतरी कमरता जाणवते.
त्या नसलेल्या, न भेटलेल्या किंवा कदाचित भेटून दूर गेलेल्या
माझ्या मित्रासाठी या चार ओळी..

असा कोण हा मित्र माझा,
ज्याची हुरहुर लागलीय क्षणोक्षण
न पाहिलेला स्वप्नसखा
त्याचा विरह भोगतोय मनोमन.

चिंब भिजलेली रात्र

-राहुल

चिंब भिजलेली एक रात्र
अजुनही निजली नाही
तुझ्या आठवणींची एक सर
अजूनही सरली नाही

किती वारे आले अन् गेले कितीतरी
तुझ्या श्वासाने दरवळलेली एक झुळुक
अजूनही विरली नाही

शिंपडू देत मनसोक्त आज मला
माझीच आसवे
तुझ्या विरहाची अग्नी
अजूनही शमली नाही

श्रावणमास

-बालकवी

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणांत येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणि भासे !

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! ती उघडे
तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळेपिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा;
सर्व नभावर होय रेखिले सुंदरेतेचे रूप महा.

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनी भिजले अपुले पंख पांखरे सावरिती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारेही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे.
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे

सुवर्णचम्पक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला;
पारिजातही बघता भामारोष मनीचा मावळला!

सुंदर परडी घेउनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले-पत्री खुडती,

देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयांत,
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत!

मी भाग्यवंत...

-Rahul Bhalerao
कधी कधी दुसऱ्याचे बोलसुद्धा स्वतःचेच वाटतात... अशीच एक मनाला भिडलेली..
forward होऊन आलेली.. एक कविता..

मी भाग्यवंत...

संध्यादेखील करतो मी, दारूसुद्धा पितो मी,
पुरणपोळी चापतो मी, तंगडीदेखील तोडतो मी

हिंदी सिनेमे पाहतो मी, विंग्रजीसुद्धा झाडतो मी,
'दादांना' मात्र तोड नाही, एवढेच फक्त मानतो मी

शिव्यादेखील देतो मी, कवितादेखील करतो मी,
कधी कुणालाही हरवतो मी, कधी जिंकता जिंकता हरतो मी

आध्यात्मावर बोलतो मी, फ्लर्टिंगसुद्धा करतो मी,
'मी मी' करतो मी, कधी 'selfless' देखील होतो मी

प्रेम करत नाही कुणी, म्हणून 'डिप्रेस' देखील होतो मी,
स्वतःलाच समजावतो मग, "नाही रे, त्यांच्याच नशिबात नाही मी!"

कधी देवाशी बोलतो मी, कधी मौनाला धरतो मी
जिवलग एखादा चुकलाच तर, लेक्चरसुद्धा झाडतो मी

सगळ्या जगाचे प्रश्न सोडवायला, असतो नेहमीच उत्सुक मी
स्वतःचे प्रश्न सोयीने मात्र, अनुत्तरीतच ठेवतो मी

"आपलं आयुष्य वेगळं, आपली दुखः वेगळी.."
नेहमी स्वतःच्याच कक्षेत फिरतो मी...
सभोवती मात्र जेव्हा असहाय्य दीन पाहतो मी,
खरंच, स्वतःला खूप भाग्यवंत समजतो मी.

प्रकाशधारा

-राहुल
चला वर्षवू प्रकाशधारा, तिमिरांच्या जगती।
चला फैलवू स्नेहसुगंधा, दुरितांच्या जगती।।

याच दलदलीतुनी उगवतील
पंकज ज्ञानाचे
याच गलबलीतुनी झेपवतिल
पक्षी स्वातंत्र्याचे

समतल, उज्वल, उदात्त धेय्य तव
पर्वतही झुकती ।।१।।
चला वर्षवू...

कोटि-कोटि कर किरणांसम तव
अवगत प्रज्ञाने
उजळुनी टाकी सुवर्णापरी
उजाड उद्याने

आकांक्षेने आज उद्याची
इतिहासे घडती ।।२।।
चला वर्षवू...

आज जागवू धम्मसविता
विश्वबंधुतेने
आज जोडुया मने मनांशी
मातीच्या धाग्याने

अवखळ वाटा मार्ग सोडिती
मानवा पुढती ।।३।।
चला वर्षवू...

सागरी-सांज

-राहुल
साद देती सखे गं या सागरी लहरी
येशील सांजवेळी या सागरी किनारी ।।धृ।।

येती किती तरी गं या सागरा उभारे
केस कुरवाळताना उठती किती शहारे
बोल छपवू नको गं ओठांच्या तिजोरी ।।
......येशील सांजवेळी

क्षितिजावरी अभाळ धरेवरी झुकले
प्रेम या सागराचे किनारी धडकले
भेटीस साक्ष देईल चांदणे रुपेरी ।।
......येशील सांजवेळी

रेंगाळला इथे गं हा रेशमी समीर
जात्या क्षणासवे होतोय जीव अधीर
आहे तुझ्याचसाठी हा श्वासही अखेरी ।।
......येशील सांजवेळी

तांबे-सोन्याची नांद

- ग्रेस

निळसर डोंगर घळीघळीतुन धूर धुक्याचा निघत असे
खेड्यामध्ये गांव पुरातन तसा वसविला मला दिसे

खडकसांधणी परी नदीचे वळण पुलातुन निघे पुढे
पारदर्शनी पाण्याखालून माशांचाही जीव रडे

हातामध्ये रिक्त कमंडलु, तहान गळ्यावर घे जोगी
गावापासुन दूर अरण्ये वणवा वणव्याच्या जागी

अग्नीशी संगनमत सोडूनिया वाराही ईकडेच फिरे
पंथ सोडुनी जशी प्रणाली एकट कवितेतून झरे

मनगट उसवी लख्ख तांबडे कडे चमकते की जळते
जळते तांबे कनकदिप्तीवर खरेच का सोने होते?

वाळुवरुनी पाय उचलिता गुडघे कोपर झांझरती
मेंदुमधुनी शिळा अहिल्या झर्रकन ये चरणावरती

इथे मेघ झरण्याच्या पुर्वी वाकुन बघतो रे खाली
पात्र नदीचे किती भयंकर किती तळाची रे खोली?

उडे कावळा चिमण्यांनीही भुर्रकन अंगण सावरले
खेड्यामधले गावामधले लोक भाबडे बावरले

या पाणवठ्यावर

- रॉय किणीकर

या पाणवठ्यावर आले किती घट गेले
किती डुबडुबले अन बुडले वाहुनि गेले
किती पडले तसेच काठावरती
किती येतील अजुनि नाही त्यांना गणती

हा असा राहु दे असाच खाली पदर
हा असा राहु दे असाच ओला अधर
ओठात असु दे ओठ असे जुळलेले
डोळ्यात असु दे स्वप्न निळे भरलेले

संपेल कधी ही शोधायाची हाव
फोडिले दगड दशलक्ष दिसेना देव
पसरतो शेवटी हात तुझ्या दारात
अश्रुत भिजावी विझताना ही ज्योत

ही वाट वेगळी तुझी नसे रे त्यांची
ही दुनिया आहे केवळ हसणाऱ्यांची
दाखवू नको रे डोळे ते भिजलेले
जा तुडवित काटे, रक्ताने जरी भरलेले

काळोख खुळा अन खुळीच काळी राणी
संकोच मावला मिठीत सुटली वेणी
अंजिरी चिरी विस्कटे सुटे निरगाठ
ओठात चुंबने भरली काठोकाठ

गुदमरली काजळकाठावरची धुंदी
कळवळली हिरवी तळटाचेवरची मेंदी
पाळणा झुले मांडीवर मिटले ओठ
पदरातुनी फिरली एक तान्हुली मूठ

ओठात अडकले चुंबन रुसले गाल
कोयरीत हिरवा चुडा विरघळे लाल
घालता उखाणा फणा रुपेरी खोल
अंकुरले अमृत ढळता नाभी कमळ

असाच

- ना. घ. देशपांडे

वेगळीच जात तुझी;
वेगळाच ताल
तूं अफाट वाट तुझी
एकटाच चाल.

एकटाच चालत जा
दूर दूर दूर
गात गात तूंच तुझा
एकटाच सूर

एकटाच चालत जा
उंच आणि खोल;
बोल आणि ऍक पुन्हा
तूं तुझा बोल.

तूं असाच झिंगत जा
विस्मरून पीळ
तूं असाच फुंकीत जा
अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा
भास तूं तुझेच्;
शांततेत ऍकत जा
श्वास तूं तुझेच.

खोल या दरीत अशा
गर्द साऊलीत
हो निमग्न तूंच तुझ्या
मंद चाहुलीत.

तुझे नाम मुखी

- केशवसुत

केशवसुतांनी त्यांच्या अखेरच्या काळात केलेली ही शेवटची कविता (अभंग)

तुझे नाम मुखी ध्यान तुझे डोळा
व्रुत्ती या चंचळा स्थिरावल्या॥

चिंता भय दुःखे अवघी दूर झाली
अनाथांचा वाली जवळी केला॥

भिकार या जगी इच्छित न मिळे काही
म्हणुनी तुझे पायी भिक्शां-देहि॥

केशवसुत म्हणे देवा दीन-नाथा
तुझे पायी माथा वाहियेला॥

स्फूर्ती

- केशवसुत

काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
प्राशन करिता रंग जगाचे कणोकणी ते बदलू द्या !

अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपि पर्वा कसली मग याची !
जिव्हेची बंधने तर ढिली करा तीव्र या पेयाने,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगाने !
होउनिया मग दंग मनी,
व्हावे ते आणा ध्यानी,
गा मग सुचतिल ती गाणी,
परिसुनी त्यांचे शब्द, रुढीचे द्यास झणी ते खवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उकळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हाला !
औचित्याच्या फोल विवेका, जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरी जाऊ
उडुरत्ने ती गरीब धरेला तेथुन फेकुनिया देऊ !
अडवतील जर देव, तरी
झगडू त्यांच्याशी निकरी
हार न खाऊ रतीभरी !
देवदानवा नरे निर्मीले हे मत लोकां कवळू द्या !
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

पद्यपंक्तीची तरफ आमुच्या की विधीने दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसे !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे.
उडवुनि देऊनि जुलुमाचे या करु पहा तुकडे तुकडे !
महादेव ! हरहर ! समराचा गर्जत तो वाऱ्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कर्णी ..निजती ते ठारची मरती !
उठा उठा बांधा कमरा
मारा किंवा लढत मरा
सत्वाचा उदयोस्तु करा !
छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तीमित जगाला ढवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

कोलंबसाचे गर्वगीत - कुसुमाग्रज

- कुसुमाग्रज

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

दूर

दूर

दूर तेथे...दूर तेव्हा सांज झाली
दूर तेथे आपलीही लाज गेली
एक तूं अन एकला मी एक झालों
एक होतांना घनाच्या आड गेलों
झाकला लाजून तूं गे गाल डावा
त्या घनाच्या आड होता चंद्र तेव्हा...

-आरती प्रभू

मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे

तू गेलीस तेव्हा 'थांब' म्हणालो नाही
'का जाशी' ते ही 'सांग' म्हणालो नाही.
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
'हे अंतर आहे लांब' म्हणालो नाही ...

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का ही नजरच ओली होती
निपटून काढता डोळ्यांमधले पाणी'
जा! फिटले सारे पांग!'- म्हणालो नाही

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे!
असहाय लागला आतून वणवा सारा
पण वणव्याला त्या आग म्हणालो नाही...

बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग- म्हणालो नाही...

हे श्रेय न माझे तुझेच देणे आहे!
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग- म्हणालो नाही...

मुली

मुली

'मुलीची जात'
हे शब्द उच्चारवत नाही मला!
मुली कशाही वागल्या
तरीही...
मुली मुलीच असतात!
किती तन्मयतेनं
त्या सजवित राहतात घर!
त्यांच्या नुसत्या असण्याने
बोलू लागतात भिंती
नि डोलू लागते छप्पर...
मुली भरुन टाकतात अंगण
नि वळचणीतले रांजण
मनातल्या स्वप्नांनी-रंगांनी
शाश्वत रंगांनाही रंग देण्याचे
कौशल्य असते त्यात.
हा सोस नसतो मुलींचा
तर ध्यास असतो नव्या उर्मींचा!

मुली असतात
उन्हाची कातरछाया
लहरती.. बहरती कापूर काया
त्या सुखाचा मंद प्रकाश
नि मायेचं झुलतं.. धुंद आकाश
त्या विश्वाचा कोवळा हात
जगाची अधाशी तहान
त्या असतात
काळाचे फडफडते
कोरे करकरीत पान...
म्हणून मुलींना
करु द्यावेत हट्ट
नि होऊ द्यावे स्वच्छंदी
हीच तर असते
त्यांच्या प्राक्तनात पेटलेल्या
निरांजनातील असोशीची नांदी.

- अशोक कोतवाल