Saturday, June 02, 2007

मुली

मुली

'मुलीची जात'
हे शब्द उच्चारवत नाही मला!
मुली कशाही वागल्या
तरीही...
मुली मुलीच असतात!
किती तन्मयतेनं
त्या सजवित राहतात घर!
त्यांच्या नुसत्या असण्याने
बोलू लागतात भिंती
नि डोलू लागते छप्पर...
मुली भरुन टाकतात अंगण
नि वळचणीतले रांजण
मनातल्या स्वप्नांनी-रंगांनी
शाश्वत रंगांनाही रंग देण्याचे
कौशल्य असते त्यात.
हा सोस नसतो मुलींचा
तर ध्यास असतो नव्या उर्मींचा!

मुली असतात
उन्हाची कातरछाया
लहरती.. बहरती कापूर काया
त्या सुखाचा मंद प्रकाश
नि मायेचं झुलतं.. धुंद आकाश
त्या विश्वाचा कोवळा हात
जगाची अधाशी तहान
त्या असतात
काळाचे फडफडते
कोरे करकरीत पान...
म्हणून मुलींना
करु द्यावेत हट्ट
नि होऊ द्यावे स्वच्छंदी
हीच तर असते
त्यांच्या प्राक्तनात पेटलेल्या
निरांजनातील असोशीची नांदी.

- अशोक कोतवाल

1 comment:

Unknown said...

kay khot khot lihatos