तू घाव घातले अन
जगणे कठीण झाले.
डोळ्यात आसवांचे
लपणे कठीण झाले.
केले मनास माझ्या
त्यांनीच जायबंदी
बंदिस्त पाखराला
उडणे कठीण झाले.
होऊन शुर योद्धा
जग जिंकण्या निघालो
मज सोबत्याविरोधी
लढणे कठीण झाले.
विसरुन पार गेलो
आनंद जिंदगीचा
आता सुखा तुझ्याशी
जमणे कठीण झाले.
स्वप्नातली कळी तू
मी दोस्त यातनांचा
येथे तुझे न माझे
जुळणे कठीण झाले.
No comments:
Post a Comment