- १/२ किलो मटण खिमा
- २ मध्यम आकाराचे कांदे, १ टोमॅटो
- १ टी स्पून काश्मिरी मिरचीचे लालबुंद तिखट
- १/२ टी स्पून हळद
- १ टेबल स्पून आख्खे धणे
- १/२ टेबल स्पून आख्खे जिरे
- १० नग काळी मिरी
- ७ नग लवंग
- ४-५ नग हिरवी वेलची
- २" दालचिनीचे तुकडे
- १ टी स्पून बडीशोप
- १/२ फुल बाद्यान
- १ टेबलस्पून आलं लसूण पेस्ट
- १ लिंबू
- मीठ चवीनुसार
- १/२ वाटी वनस्पती तुप
- १ टी स्पून कसूरी मेथी पावडर
- २ अंडी
- कोथिंबीर जरा जास्तच.
क्रमवार मार्गदर्शन: खिमा धुवून पिळून घ्यावा.
कांदे बारीक चिरून घ्यावेत. टोमॅटोही बारीक चिरुन घ्यावा. दोन्ही, भेळेसाठी चिरतात त्या प्रमाणे, चौकोनी आणि एकदम बारीक चिरावेत. धणे, जिरे, मिरी, लवंग, वेलची, दालचिनी, बडीशोप, बाद्यान मंद आंचेवर भाजून घ्यावेत. एका ताटलीत काढून पूर्णपणे थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यावर मिक्सरवर बारीक (वस्त्रगाळ) दळून घ्यावेत. लिंबाचा रस काढून ठेवावा. अंडी उकडून त्यांच्या उभ्या, चार-चार, फोडी करून ठेवाव्यात. कोथिंबीर बारीक चिरून ठेवावी. खिम्याला तिखट, हळद, वरील दळलेला गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, लिंबूरस आणि मीठ लावून सर्व नीट मिसळून ठेवावे. खिमा अर्धा तास मुरण्यास ठेवून द्यावा. अर्ध्या तासा नंतर, जाड बुडाच्या पातेल्यात (किंवा कढईत) तुप गरम करावे. तुप गरम झाले की त्यात कांदा लालसर रंगावर परतून घ्यावा. कांदा परतला की टोमॅटो टाकून परतावा. टोमॅटो शिजून एकजीव झाला, तुप सुटले की, खिमा टाकून परतावा. अगदी अर्धीवाटी पाणी टाकून पुन्हा नीट मिसळून झाकून, अगदी मंद आंचेवर शिजवावा. शिजल्यावर, जर पाण्याचा अंश अजून असेल तर, झाकण न ठेवता मध्यम आंचेवर पाणी आटवून टाकावे. तुपाचा तवंग दिसला पाहीजे. खिमा जळणार नाही ह्याची काळजी घ्यावी. वरून कसूरी मेथी पावडर, अर्धी कोथिंबीर घालून मिसळून घ्यावे. शेवटी अंडी घालून हलक्या हाताने मिसळावे.
काचेच्या वाडग्यात (सर्व्हींग बाऊल) काढून वरून उरलेली कोथिंबीर भुरभुरावी.
शुभेच्छा....!
माहितीचा स्रोत: निरिक्षण आणि स्वानुभव.
अधिक टीपा: खिमा बाहेरून आणल्यावर किंचित कोमट पाण्यात घालून ठेवावा. त्यामुळे त्यातील चरबी सुटून वर तरंगते ती काढून टाकता येते. चरबीची चव आवडत असेल तर ठेवायला हरकत नाही. पण खिमा धुवावा जरूर. (अशा वेळी थंड पाण्यात घालून लगेच धुवून घ्यावा म्हणजे चरबी वाहून जात नाही.)
खिम्यात मटार, बटाटे, भोपळी मिरची वगैरे सर्व किंवा ह्यातील एखादी भाजीही घालतात. (मटार, बटाटे उकडून घालावेत.)
अंडी नाही घातली तरी चालतात. पण, घातल्यास दिसतात छान. अंडी खिम्यात न मिसळता, खिमा काचेच्या वाडग्यात काढल्यावर सर्वात वर, फुला प्रमाणे, सजविल्यासही सुंदर दिसतात.
काचेच्या वाडग्यात अगदी जेवायच्या आधी खिमा काढून सजवावा. कोथिंबीर हिरवीगाऽऽर असावी. कोथिंबीर घातल्यावर झाकण ठेवून नये. (मलूल पडते आणि रंग उतरतो.)
No comments:
Post a Comment