Friday, November 17, 2006

वाचायचे जाते राहून....


पत्र लिहि, पण नको पाठवू,

शाईमधूनी काजळ गहिरे...

लिपिरेषांच्या जाळीमधूनी,

नको पाठवू हसू लाजरे...


चढण लाडकी भिवयिमधली,

नको पाठवू वेलांटितून...

नको पाठ्वू तीळ गालिचा,

पुर्णविरामांच्या बिंदूतुन...


नको पाठवू अक्षरांतुनी,

शब्दांमधले अधिरे स्पंदन...

कागदातूनी नको पाठवू,

स्पर्शामधला कंप विलक्षण...


नको पाठवू वीज सुवासिक,

उलगडणारी घडीघडीतून...

नको पाठवू असे कितिदा,

सांगितले मी: तू हट्टी पण...


पाठविशी ते सगळे सगळे,

पहिल्या ओळीमधेच मिळते...

पत्रच पुढचे त्यानंतर पण,

वाचायचे जाते राहून....

--- इंदिरा संत

No comments: