सकाळी साखरझोपेत असतानाच मला हलकसं कळालं होतं
आमच्या शेजारी म्हणे कुणी नवं बिऱ्हाड रहायला आलं होतं
" जराशी मदत कराल ?" म्हणत काकूंनी आईला विनवलं होतं
त्यांच्या पदराआडून एक चाफ़ेकळी फ़ुल हळूच डोकावलं होतं
कुणीतरी खेळायला मिळणार म्हणून मन कोण आनंदलं होतं
घर लावता लावता कधी दोघांची गट्टी जमली कळालंच नव्हतं
लुटूपुटूचाच संसार , पोळी करपली असं मी तिला चिडवलं होतं
चिडून मग तिनं गोबरे गाल अन आपलं नपरं नाकं फ़ुगवलं होतं
गंम्मत केली तुझी , असं समजावता तीनं नाकी नऊ आणलं होतं
पत्यात मागच्या आरश्यात पाहून तिला मी हवं ते पान टाकलं होतं
" कस्स हरवलं ", तिची टूणकन ऊडी पाहून मन हर्षानं दाटलं होतं
गप्पाटप्पा , स्नेहभोजन , सहली हे आता नेहमीचंच झालं होतं
मी मुळात खोडकर , सागरकिनारी तिचं वाळूचं घर मोडलं होतं
व्रात्य कार्ट म्हणून बाबांनी काय बेदम बडव बडव बडवलं होतं
खबरदार , पुन्हा तिच्या वाटेला जाशील तर असं दटावलं होतं
तिनं " फ़ार दुखतय का रे ? म्हणून गुडघ्याला मलम लावलं होतं
माझी जोरात किंकाळी , त्या टपोऱ्या डोळ्यात पाणी तरळलं होतं
पण एकदा का कोण जाणे थोरामोठ्यांच काहीतरी बिनसलं होतं
तिच्या बाबांनी आमचा शेजार कायमचा सोडायचं असं ठरवलं होतं
हातातून हात सोडवताना आईनं तिला अस्स जोरात खेचलं होतं
तिला जाताना पहावणार नाही , मी स्वतःला दारामागे लपवलं होतं
मला सोडून जाताना , ते चिमण - पाखरू काय मुसमुसून रडलं होतं
कालौघात ते निष्पाप बालविश्व केव्हाच अलगद पुसलं गेलं होतं
अधुन मधुन तिची आठवण , मी एक सविस्तर पत्रही पाठवलं होतं
पत्ते बदललेले , इच्छीत स्थळ सापडलं नाही म्हणून परत आलं होतं
पोटापाण्याच्या धावपळीत , धुक्यात ते निर्व्याज मैत्र कुठेतरी हरवलं होतं
प्रत्येक वळणावर , वेडं मन मग त्या निरागस बालमैत्रीणीला शोधत होतं ….
1 comment:
nice yar so nice .i want some more poems where i got it
Post a Comment