लाल जखमा.. भळ्भळ वाहणार्या
सारा जमाव पाहतो आहे
खुनशीपणाने हसतो आहे
दगडांची अस्त्रं परजतो आहे
काळजाचे ताट माझ्या फोडतो आहे
समोर फक्त काळोखच मला दिसतो आहे
मारा.. ठोका.. फेकून द्या साल्याला..
माझा रस्ता काटला याने
श्रीमंतीचा घोट घेतला याने
झोपडीचा प्रासाद केला याने
पोटशूळीचा अंगार जाळतो आहे
समोर फक्त काळोखच मला दिसतो आहे
बस.. याचा खेळ खलास करायचा
सशाचा ससाणा होतोच कसा?
डोळ्यात मिजास याच्या येतोच कसा?
सगळ्यांना किडेच समजतो जसा
मी पुढारलो तर उद्रेक का भडकतो आहे?
समोर फक्त काळोखच मला दिसतो आहे
अरे जा.. कोण घाबरतो तुम्हाला?
तुमच्या समोर उठणार मी
पचविणार सगळे प्रहार मी
संपलो तरी उरणार मी
अस्तित्वाची लढाई मी लढतो आहे
स्वयंभू प्रकाशाचा भास मला होतो आहे
- शशांक दळवी
No comments:
Post a Comment