Wednesday, July 25, 2007

क्रोधाग्नी..एक चटका

टिप : एका सत्यघटनेवर आधारीत......
-------------------------------------

उत्तरप्रहर, मी गाढ झोपेत,
अपरात्री फ़ोनची घंटा खणखणली
बाहेरगावच्या मैत्रीणीचा नंबर
पाहून मनात शंकेची पाल चुकचकली
"अत्यंत तातडीची मदत हवीय,
ताबडतोब निघ" तिनं आज्ञा सोडली

"सुमी, परवा रात्री न सांगताच
कूणाचा तरी हात धरून पळून गेली
विधात्याचा लेख बघ, दुर्दैवाने
तिथेही तिची पाठ नाही रे सोडली
अपघातात त्याच्यासकट बाकीची
जागीच ठार,ती गंभीर जखमी झाली
तीने घडलेली सारी हकीकत
एका श्वासात न थांबता सांगून टाकली

"माझ्या कडून काय मदत हवी आहे"
अनपेक्षीत धक्का पचवित मी विचारणा केली
तिला मदत करावी, सार्‍यांची मी किती
गयावया केली, कुणीच भीक नाही घातली
वाटलं तू काहीतरी करशील म्हणून
अपरात्री तुला साद, ती पार रडवेली झाली

प्रत्येकाच्या डोळ्यात अंगार,आप्त
नातेवाईक मंडळी कोंडाळी करुन बसलेली
घाव अगदी ताजा, नुकता काल-परवाचा
झाडून सारी जणूकाही सुडाग्नीने पेटलेली
"जखमी प्राण्याला पण आपण मदत
करतो, हे तुमचं रक्त" मी समजुत काढली

"मदत करण्याचा विषय सोडून बोल"
बापाने करारीपणे आपली भूमिका स्पष्ट केली
"परवा तिचं श्राद्ध होतं, ती आम्हाला मेली
ज्या दिवशी तिने घराची लक्ष्मणरेषा ओलांडली
पोरीने केलेला विश्वासघात आठवून, बापाने
बहूदा मनातल्या मनात जोरदार शीवी हासडली

पाहून सार्‍यांचा एकंदर रागरंग, खवळलेल्या
समुद्रात नौका घालण्याची कल्पना, मी टाळली
"या घडीला गरज तिची, नंतर करायचं
काय तिचं, निवड तुमची" मी विनवणी केली
आणि म्हणालो,"तिला वाचवू शकला असता
तुम्हाला उपरती नाही झाली म्हणजे मिळवली

कुठलंस फ़ुटकळ इस्पितळ, तोच तो
चिरपरिचित विचित्र औषधी गंध, अंधारी खोली
शरीरावर असंख्य जखमा, जुन्यापुराण्या
खाटेवर मुटकुळं करुन ती निपचित पडलेली
माझी हलकेच थाप, तीची गाढ निद्रा भंग
पावली, मला पाहून तिला थोडी हुशारी आली

"माझ्याकरीता फ़ुलं नाही आणलीस?"
ती करुण चेहेर्‍यावर मिश्किली आणत म्हणाली
"अग वेळच नाही मिळाला गडबडीत,
लगेच आणू का?" मी उगाच सारवासारव केली
"चल सोड रे, तुला माझ्या पार्थिवावर
वहायला उपयोगी पडतील" ती कसंनुसं हसली

No comments: